Friday, February 12, 2010

मला परत लहान होता येईल का?

कंबरेच्या करदोऱ्याने हाल्फ चड्डी टाईट करून,
डोक्यावरली टोपी तिरकी करून,
खांद्यावर बॅट घेऊन,
सकाळी खेळताना लागलेली जखम लपवून,
दुपारी परत आईची नजर चुकवून,
परत मैदानात खेळता येईल का?
मला परत लहान होता येईल का?

घड्याळाची काळजी सोडून,
तहान-भूक विसरून,तास्-न-तास् खेळून,
घरी परतताना मित्राशी भांडून,
पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला खिडकीतून हाक मारून,
खेळायला बोलावता येईल का?
मला परत लहान होता येईल का?

गृहपाठ विसरून,वर्गपाठाची वही हरवून,
पहिल्या बाकावरून उठून,
हळूच शेवटच्या बाकावर लपून,
शेजारच्या मित्राला शिक्षा झालेली बघून,
मधल्या सुट्टीत,चिडवता-चिडवता डब्बा खाता येईल का?
मला परत लहान होता येईल का?

शेजारची मुलगी जाताना पाहून,
मित्रांची नजर चुकवून,
तिला हात दाखवून,पण तिने लक्ष दिले नाही म्हणून,
मित्रांच्या गर्दीत तिला परत विसरवता येईल का?
मला परत लहान होता येईल का?

आवडती भाजी नाही म्हणून,
आईने दिलेला डब्बा मुद्दामच घरी विसरून,
दुपारी शाळेच्या गेट बाहेर जाऊन,
ठोसर काकाच्या वडापाव हादडून,
परतताना पेप्सी चोकाता येईल का?
मला परत लहान होता येईल का?

एका दिवसा साठी तरी,
ऑफिसचे कपडे सोडून,
पुन्हा मळलेली पेंट,आणि बटन तुटलेले शहरात घालून,
शाळेत जाता येईल का?
Mr .भंडारे विसरून,मला परत,
मित्रांचा निल्या होता येईल का?
मला परत लहान होता येईल का?

No comments:

Post a Comment